प्राजक्ता भांबुरे बोंगाळे – कोकण सुकन्येची अमेरिकन सैन्य दलात निवड.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीची प्राजक्ता भांबुरे बोंगाळे (सारा बोंगाळे) हिची अमेरिकेच्या सैन्य दलात (US Army) निवड झाली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या या कोकण सुकन्येने अत्यंत कठीण आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक आठ महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून अधिकृत पदवी प्राप्त केली. सध्या ती अमेरिकन सैन्यदलाच्या मेडिकल विभागात सेवा देत असून, प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीसाठी मार्क्समनशिप पदक मिळवले आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मराठी महिलेच्या रूपात तिने इतिहास रचला आहे.
दापोलीच्या मातीतील या तरुणीच्या मेहनत, धैर्य आणि समर्पणाने कोकणवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. प्राजक्ता हिची ही यशोगाथा कोकणातील युवतींसाठी प्रेरणादायी ठरली असून, स्वप्नं मोठी ठेवली आणि कष्ट केले तर जगात कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते, हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



