तब्बल एका महिन्याच्या विलंबानंतर आंबोली घाटातील मुख्य धबधबा अखेर मंगळवारी प्रवाहित झाला आहे. यामुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाची औपचारिक सुरुवात बुधवार, १ जुलै पासून होणार असून, देशभरातील पर्यटकांसाठी ही अत्यंत स्वागतार्ह बातमी आहे. मुख्य धबधब्यासह घाटमार्ग व परिसरातील सर्व धबधबे सध्या प्रवाहित झाले असल्याने पर्यटन व्यावसायिक पूर्ण तयारीत आहेत. यंदाचा हंगाम यादगार आणि उत्साहपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाने जून महिना कोरडा टाकल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. आंबोली परिसरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुख्य धबधबा प्रवाहित झाला असून, पावसाचा हा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत तो पूर्ण क्षमतेने वाहू लागेल, अशी आशा आहे. घाटमार्गावरील इतर सर्व धबधबे देखील सध्या प्रवाहित असल्याने पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा मनमोहक अनुभव मिळणार आहे.



