आंजिवडे-कुंभ्याचीवाडी येथील जीवघेणा साकव! पक्क्या पूलची मागणी, राजकीय आश्वासने हवेत विरतात

top news channel in konkan, konkan news, Konkan news channel, malvan news

दुकानवाड (माणगाव खोरे), १८ जुलै २०२६: माणगाव खोऱ्यातील आंजिवडे-कुंभ्याचीवाडी येथील अस्तित्वात असलेला पूल गेली अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. पुलावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले असून, पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून लाकडी काठ्यांचा तात्पुरता साकव ओलांडावा लागतो. शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांसाठी हा प्रवास कसरत बनला आहे.
वाडीच्या दोन्ही बाजूला नद्या असल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. नदी पार करण्यासाठी दुसरे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दरवर्षी स्वखर्चाने आणि श्रमदानातून लाकडी साकव बांधावा लागतो. हा साकव पूर आला की वाहून जातो आणि गावाशी संपर्क तुटतो. मग पुन्हा ग्रामस्थ एकत्र येऊन साकव बांधतात. वर्षातून दोन ते तीन वेळा हा साकव बांधण्याची वेळ येते.
ग्रामस्थ साबाजी सकपाळ म्हणाले, “निवडणूक आली की राजकीय पुढारी आश्वासन देतात, पण निवडणूक संपल्यावर कोणीही फिरकत नाही. शाळकरी मुलं, आजारी रुग्ण आणि वयोवृद्धांना या साकवावरून मोठी कसरत करावी लागते. कधी तरी अपघात होईल तर जबाबदारी कोण घेणार?”
यावर्षी साकव बांधण्यासाठी ग्रामस्थ सुरेश खरवडे, साबाजी सकपाळ, मोहन धुरी, वसंत धुरी, दिलेश पुरी, सुदीप परब, प्रकाश शेडगे, दिनकर शिंदे, वसंत डांगी, गुरु डांगी, वसंत खरवडे, राजन धुरी, आनंद खरवडे, गणपत धुरी, मोहन पंदारे, काशिराम धुरी, साहील रेमुळकर, शिवाजी नाटेकर व इतर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
ग्रामस्थांचा सांगावा आहे की, “अनेकदा पूल बांधण्याची मागणी केली तरी दुर्लक्ष केले जाते. आम्हाला पक्का साकव किंवा लहान पूल हवा आहे. यासाठी निधी मंजूर करून आम्हाला या जीवघेण्या समस्येतून कायमचे मुक्त करावे.”
या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर आणि सुरक्षेवर परिणाम करणारा हा गंभीर प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top