रिपोर्टर: उदय बापर्डेकर
आचरा : कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता आणि अथक परिश्रम यांना अखेर यशाचे सोनेरी कोंदण मिळाले आहे. आचरा गावचे सुपुत्र आणि आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती झाली आहे. यामुळे आचरा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, गावासह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस दलात ३५ वर्षे प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने सेवा बजावणाऱ्या तुकाराम पडवळ यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ही बढती मिळवली आहे. सावंतवाडी, कुडाळ, देवगड आणि मालवण तालुक्यात विविध ठिकाणी जबाबदारीची पदे सांभाळत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी नेहमी तत्परता दाखवली.
शांत स्वभावाचे, संयमी आणि जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून तुकाराम पडवळ यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा पूर्ण विश्वास त्यांनी संपादन केला आहे.
तुकाराम पडवळ यांच्या या यशामुळे आचरा गावाचा गौरव वाढला आहे. गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



