सिंधुदुर्ग: ‘जलसिंधू’ निवासी संकुलाचा भूमिपूजन; पालकमंत्री नितेश राणे यांचा १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्देश

konkan varta image (12)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या महत्वाकांक्षी निवासी संकुल प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्प शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनमान उपलब्ध करून देणारा उपक्रम असल्याचे सांगत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “या वसाहतीचा आराखडा उत्कृष्ट आहे. बांधकामाची गुणवत्ता सर्वोत्तम असली पाहिजे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प दीड वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा.”

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या निवासी संकुलामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल आणि विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top