आंबा आणि राज्यातील काजू बागायतदारांनी विविध माध्यमांतून आंदोलने उभारल्यानंतरही शासन बागायतदारांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नसल्याने ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्री भागात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलन व मेळाव्यात विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष आनंद ऊर्फ काका ढोके यांनी दिली. या भागात प्रस्तावित प्रकल्पाला बागायतदारांचा तीव्र विरोध असून, तालुक्यातील मुणगे भागातील संभाव्य प्रकल्पालाही विरोध करण्यासाठी बागायतदार मेळावा घेण्यात येणार आहे. बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“राज्य शासनाने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची तुटपुंजी रक्कम आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन उभारले जाईल,” असे गणेश गावकर यांनी स्पष्ट केले. माजी खासदार विनायक राऊत, महादेव जानकर, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मेळाव्यात मार्गदर्शन करतील. यावेळी प्रशांत शिंदे, शरद परब आदी उपस्थित होते. वातावरण बदलामुळे यंदाचा आंबा हंगाम अडचणीत आला असताना, विनाशकारी प्रकल्पांमुळे आंबा-काजू पिकांना पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता बागायतदारांनी व्यक्त केली आहे.



