रत्नागिरी: येथील भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि कोकण पदवीधर प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला.
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार श्री. प्रमोदजी जठार उपस्थित होते. तसेच पदवीधर प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक श्री. धनराजजी विसपुते, कोकण पदवीधर प्रकोष्ट भाजपाचे संयोजक श्री. सचिनजी मोरे, रत्नागिरी जिल्हा पदवीधर प्रकोष्टचे संयोजक श्री. मनोजजी पाटणकर, भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव आणि शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याचसोबत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आपल्या लेखणीची चुणूक दाखवणाऱ्या उत्कृष्ट निबंध लेखकांनाही आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कौतुक सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली. या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



