नेपाळमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत देवगड तालुक्यातील हिंदळे येथील कु. सिद्धी संगीता मारुती चिंबे हिने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिद्धीने रौप्य पदक पटकावून भारतासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि हिंदळे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. काठमांडू येथे झालेल्या स्पर्धेत जगभरातील तगड्या खेळाडूंचा सामना करत तिने अंतिम फेरीत धडक मारली आणि उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.
लहानपणापासून कराटेची आवड जोपासणाऱ्या सिद्धीने कठोर मेहनत, नियमित सराव आणि अदम्य जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. ग्रामीण भागातील मुली देखील योग्य संधी आणि मेहनतीने आंतरराष्ट्रीय यश मिळवू शकतात, याचे सिद्धीने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



