सिंधुदुर्ग (विशेष प्रतिनिधी): आजगाव दशक्रोशीमध्ये प्रस्तावित JSW मायनिंग प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी ग्रामदैवत श्री वेतोबा मंदिरात मोठ्या संख्येने जनआंदोलन छेडले. मायनिंग कंपनीने परस्पर सर्वेक्षणाला सुरुवात केल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचा सहभाग असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात रोष दाखवला. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित पाठिंबा दिला.
यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी आमदार वैभव नाईक, उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, आरोंडा विभागाचे जि.प. सदस्य सुदन कवठणकर, ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर, शेखर आजगावकर, ऍड. स्वप्नील आजगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मायनिंगमुळे पर्यावरण व उपजीविका धोक्यात
आंदोलकांनी सांगितले की, JSW मायनिंग लॉबीचे प्रस्थ वाढत चालले आहे. यापूर्वी रेडी गाव भकास करण्यात आला आहे. आता आजगाव, धाकोरा, भोमवाडी, तिरोडा, शिरोडा, आरवली, आसोली या गावांवरही असाच परिणाम होणार आहे. दशक्रोशीत शेती, कोकम, नारळ बागायती आणि सुरंगीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मायनिंग प्रकल्प लादल्यास ग्रामस्थांच्या पारंपरिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट होईल, असा इशारा देण्यात आला.
माजी आमदार वैभव नाईक, संजू परब, रुपेश राऊळ, सुदन कवठणकर यांनी मायनिंग प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला. “मायनिंग प्रकल्प हद्दपार होऊ दे” असे गाऱ्हाणे श्री वेतोबा मंदिरात घालण्यात आले. प्रकल्पाच्या सूत्रधारांना धारेवर धरण्यात आले.
शांततेत आंदोलन संपले
ऍड. स्वप्नील आजगावकर यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन शांततेत मिटवण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मायनिंग प्रकल्पाला कडाडून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



