सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गांजा लागवडीविरोधात प्रथमच मोठी पोलिस कारवाई करण्यात आली आहे. देवगड पोलिसांनी कोटकामते येथील आडीवरेवाडीमध्ये धडक कारवाई करत ४९ हजार रुपयांची किंमत असलेली २३ गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी ओंकार राजाराम कोतेकर (वय ३०, रा. कोटकामते, आडीवरेवाडी) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. २९ मे २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने छापा टाकला. आरोपीने राहत्या घराच्या कंपाऊंडमध्ये गांजा पिकवल्याची कबुली दिली असून, ३ ते ५ फूट उंचीची ताजी २ किलो ४५० ग्रॅम वजनाची झाडे जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम बुवा करत आहेत. या कारवाईने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


