आचरा : उदय बापर्डेकर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी मिळावी आणि संगणक शिक्षण अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने पंचायत समिती मालवणचे सदस्य गणेश तोंडवळकर यांनी तोंडवळी गावातील वरची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला दोन संगणक व एक इन्व्हर्टर देणगीस्वरूपात प्रदान केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठे बळ मिळाले असून शाळेच्या शैक्षणिक सुविधांमध्येही मोलाची भर पडली आहे.
या देणगीमुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यासही इन्व्हर्टरच्या सहाय्याने संगणक शिक्षण व अध्यापनाचे काम अखंडितपणे सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या समाजोपयोगी योगदानाबद्दल उपस्थितांनी गणेश तोंडवळकर यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता परब, शिक्षिका सोनल कदम व विभा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्या अनन्या पाटील व मानसी चव्हाण, मिलिंद पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया : उदय बापर्डेकर



