संवाद हरवला तर संस्कृतीही संपते – साहित्यिक अजय कांडर

top news channel in konkan, konkan news, Konkan news channel, malvan news

आचऱ्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार सोहळा संपन्न

आचरा : उदय बापर्डेकर

आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रसिद्ध साहित्यिक अजय कांडर म्हणाले, “संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय.” धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित या संस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी होते.

याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलमधील रुद्र संजय जाधव, सई अंकुशराव घुटुकडे, नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियमचे तेजस विश्वास पेडणेकर, रंजिता राजेंद्रप्रसाद नाडकर्णी, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रथमेश राजेंद्र पुजारे, कस्तुरी नितीन परुळेकर तसेच बी.एम.एस. व कॉमर्स महाविद्यालयाचे भूषण निलेश नाईक व दर्शना सुनील परब यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्याध्यापिका मधुरा महेश माणगावकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला, तर माजी विद्यार्थी तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सन २०२५-२६ मधील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देण्यात आली. साहित्यिक अजय कांडर यांचाही सन्मानपूर्वक सत्कार झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांनी केले. मुंबई कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी संस्थेची परंपरा व ध्येयधोरणे मांडली, तर शालेय समितीचे अध्यक्ष जे. एम. फर्नांडिस यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. इकबाल काझी, ॲड. सुभाष आचरेकर, मंगेश आचरेकर, निलेश सरजोशी, संजय मिराशी, रघुनाथ पाटील, बाबाजी भिसळे, अजित आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, प्राचार्य नितेश सारंग, सुरेश ठाकूर, अशोक कांबळी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनघा कदम यांनी केले, तर आभारप्रदर्शन मायलीन फर्नांडिस यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top