आचरा (सिंधुदुर्ग): आज श्री रामेश्वर मंदिरात कोकणाच्या रक्षणासाठी आणि प्रस्तावित विनाशकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी सामूहिक गार्हाणे घालण्यात आले. या प्रसंगी गावाच्या हितासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
पूजाऱ्यांनी गार्हाण्यात प्रार्थना केली की, असे विनाशकारी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि संपूर्ण कोकणातून कायमचे हद्दपार व्हावेत. तसेच दि. २२ जुलै रोजी होणाऱ्या ग्रामसभेला प्रत्येक ग्रामस्थाने स्वतःच्या अस्तित्वासाठी, आपल्या जमिनीसाठी, गावाच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी उत्स्फूर्त प्रार्थना करण्यात आली.
आता ही जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थाची आहे. दि. २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आचरा ग्रामपंचायत येथे होणाऱ्या ग्रामसभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या गावावर येणाऱ्या संकटाला लोकशाही मार्गाने ठाम विरोध करावा. ग्रामसभा ठराव एकमताने मंजूर करून आपल्या भविष्याचा पाया मजबूत करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज वेळ आली आहे स्वतःसाठी, आपल्या जमिनीसाठी आणि गावासाठी ठामपणे उभे राहण्याची. एकदा वेळ निघून गेली तर पश्चात्ताप करूनही काही उपयोग होणार नाही, असे ग्रामस्थांना स्मरण करून देण्यात आले.



