आचरा, दि. २२ जुलै – देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत प्रकल्पाच्या विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी झालेल्या या सभेत उपसरपंच संतोष मिराशी तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, हा विरोध राजकीय नसून पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वाचा, आरोग्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. अणुऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे कॅन्सर आणि जन्मजात व्यंग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे, तसेच जमीन संपादनामुळे शेती, फळबागा आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांचे रोजगार कायमचे नष्ट होईल.
ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर, रोजगारावर आणि नैसर्गिक संपत्तीवर परिणाम करणारे निर्णय स्थानिकांची संमती घेतल्याशिवाय घेऊ नयेत, अशी मागणी केली. आचरा ग्रामसभेने एकमताने मंजूर केलेला हा ठराव परिसरातील नागरिकांच्या लोकशाही मार्गाने व्यक्त झालेल्या भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



