कुडाळ (प्रतिनिधी): येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी आणि मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी अशा एकूण २० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पहिल्या टप्प्यात उपलब्ध झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे काम अपूर्ण अवस्थेत होते. निधीअभावी हे काम रखडले होते. नाट्यरसिकांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
दुसरीकडे, मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह पूर्णपणे नादुरुस्त झाले होते. नाट्यप्रेमींना हे गृह पुन्हा वापरयोग्य होण्यासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार या नाट्यगृहासाठीही पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दोन्ही नाट्यगृहांसाठी लवकरच कामाचा शुभारंभ होणार असून, काम पूर्ण झाल्यावर दोन्ही नाट्यगृहे अद्ययावत सुविधांसह नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्राला नवी गती मिळणार आहे.



